जत्रा

 

(कवितेची चाल “तू चीज बडी है मस्त मस्त” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

हि जत्रा आली मस्त मस्त
खुश झालो आम्ही जबरदस्त
नाही आता काही सुचत सुचत
करितो सारे आता फस्त फस्त ||१||
पनीसा परेसा (४ वेळा)

हि आली आता हि माधुरी
नृत्य तिचे कसे आहे भारी
हिला नाही काही तोड तोड
नृत्य तिचे आहे गोड गोड
नाही आता काही सुचत सुचत
नृत्य करितो आम्ही मस्त मस्त ||२||
पनीसा परेसा (४ वेळा)

खेळाची आहेत येथे खूप दुकाने
खेळाचे आहेत येथे सुंदर नमुने
येथे आहे सुंदर कोडे कोडे
सोडवा आता सारे थोडे थोडे
नाही आता, नाही आता
काही सुचत सुचत
खेळ खेळतो आम्ही मस्त ||३||
पनीसा परेसा (४ वेळा)

आला आला पहा भागुजी
रत्ना त्यासाठी चिरते भाजी
भागुजी काढतो खोड खोड
रत्ना देई त्याला फोड फोड
नाही आता, नाही आता
काही सुचत सुचत
खेळ बघतो आम्ही मस्त मस्त ||४||
पनीसा परेसा (४ वेळा)

टिपरी गीत

 

(कवितेची चाल “आधा है चंद्रमा रात आधी – नवरंग” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

आला आला ग कान्हा आज हा वनी |
जमल्या साऱ्या गोपी ग आज काननी ||धृ||

लता वृक्षांनी कानन भरले
फळा फुलांनी रान हे सजले

फुले माळून हातात, गोपी येति तालात
हर्षित गोपी झाल्या ध्यानी मनी ||१||

सूर वेणूचा मधुर घुमला
टिपऱ्या टिपऱ्यांचा नाद हा आला
ध्वनी त्यांचा झाला, आली राधा बाला
आली गात रास राधा राणी ||२||

पायी नुपूर रुणझुण बोले
हाती किन किन कंगण हाले
राधा कृष्ण लीला, जीव वेडा झाला
टिपरी आली रंगात आज राणी वनी ||३||

लागली दिसाया संध्या क्षितिजाला
आली आठव घराची गोपीला
वेणू थांबव माधव, राधे घर आठव
राधा कान्हासह गोपी निघती सदनी ||४||

फूल

 

झाडावर उमलले फूल
सर्वांच्या मनास पाडते भूल |
त्याला सदा पाहत रहावे |
त्याला हलकेच स्पर्शावे |
त्याला हलकेच खुडावे |
त्याला ईश्वर चरणी वहावे
त्याला केसामध्ये माळावे |
त्याने फुलदाणीत सजावे |
मनी इच्छांचे उठते काहूर |
त्याक्षणी झाडापासून होते ते दूर |

जोडी

 

कप आणि बशी
आहे जोडी खाशी
कपबशी असे छान |
तर पाहुण्यांची वाढे शान |

कपाला नसेल कान
तर जाईल त्यांचा मान |
कपाला असेल कान
तर चहाची लज्जत महान |

कपबरोबर हवी बशी
वरासम वधू जशी
बशीला कपापासून केले दूर
आणि मगाचा वाढला भलताच नूर

चहाचे मग कॉफीचे मग
बाजारात उभे धरून तग
मगात चहा उच्चंभृंना
त्याने पोळते जीभ हा किस्सा नवा
जीभ पोळण्यापेक्षा मग दूर ठेवा
कपबशीला पूर्वीप्रमाणेच मन द्यावा |

माकडाला लागली भूक

 

एकदा एका माकडाला लागली भूक खूप |
उडया मारी तो झाडावर करीत हूप हूप |
झाडावर त्याला कोठेही मिळेना फळ |
निघेना आता त्याला भुकेची कळ |
टुणकन झाडावरून मारली त्याने उडी |
गंपूच्या खिडकीमागे मारली त्याने दडी |
गंपू होता अंथरुणात गाढ झोपेमध्ये |
माकडाच्या समोर होते जेवणाचे डबे |
जेवणाचे डबे सारे पहिले तपासून |
भाजी, पोळी, भाकरी लोणचे खाल्ले सपाटून |
खाऊन पिऊन माकडाची भूक झाली शांत |
गंपू होता झोपेतच माकड बाहेर पडले निवांत |

बडबडगीत

 

उंदराला एका सापडला फुटाणा
लगेच तिथे आली माऊताई मौना |
माऊताईला पाहून उंदीर गेला बिथरून |
पडला फुटाणा गडगडाट गेला घसरून |
उंदीरमामा बसले चडफडत थिजून |
लगेच गेल्या माऊताई मौना निघून |
टुणकन उडी मारून मिळवला फुटाणा |
घेतला फुटाणा शिरले बिळात |
फस्त केला फुटाणा एका क्षणात |

रानातल्या राघू

 

रानातल्या राघू माझा ऐकशील ना |
अंगणात माझ्या तू येशील ना |
परसातल्या झाडाचे पेरू किती गोड |
ठेवीन तुझ्यासाठी मी एक फोड |
पेरूची चव तू घेशील ना ? ||१||

हिरवे हिरवे पाचूसम अंग तुझे |
बघून वेडे मन मोहरे माझे |
लाल-लाल तुझ्या चोचीने या |
डाळिंब तू रे फोडशील ना ? ||२||

रानातला एकांत आवडे तुला
गुपित तुझे माहित मला
माझ्यासाठी एकदाच येशील ना ?
फांदीचा झुला करशील ना ?

मैत्रीण

 

एकदा मी एकटी होते घरा
खेळायला माझ्याशी कोणी नव्हते जरा |
विनू गेला आजीकडे, बानू गेली मामीकडे |
एकटीच मी करीत होते इकडे तिकडे |

‘च’ कंटाळून मी म्हंटले मनाशी |
इतक्यात लक्ष गेले कोनाड्याशी |
मैत्रीण होती माझी कोनाड्यात |
माझीच माझी वाट पहात |

चटकन मी गेले कोनाड्याशी |
उचलून तिला मी घेतले हाताशी |
कोण माझी मैत्रीण ठाऊक आहे तुम्हाला ?
घाऱ्या डोळ्यांची बाहुली माझी श्यामला |
श्यामला माझी मला मिळाली खेळायला |
वाट नको आता कोणाची बघायला |

अंकांचे गाणे

 

अकरा बारा अकरा बारा
रोगराईला देऊ नका थारा

तेरा चौदा तेरा चौदा
वाईट सवयींची टाळू या बैदा

पंधरा सोळा पंधरा सोळा
नवीन नवीन माहिती करा गोळा

सतरा अठरा सतरा अठरा
जपून छंद भरवा जत्रा

एकोणीस वीस एकोणीस वीस
वृक्षारोपणास रुजवू या बीज |

मंगल माकड

 

एक होते जंगल
त्यात माकड मंगल
माकडाला वाजली थंडी
त्याने ठरवले शिवावी बंडी
बंडीसाठी हवे कापड
शोधात निघाले मंगल माकड
असे गेले थेट बाजारात
तागाच त्याने उचलला हातात |
तसेच गेले शिंप्याकडे
शिंप्याच्या मशीनवर उभे फाकडे
म्हणे शिंपीदादा माप घ्या थोडे
बंडी शिवायचे काम करा एवढे
शिंपी घाबरला होता मनात
शिवायला बसला एका क्षणात
शिवून त्याने बंडी केली पुरी
घालून माकडाची निघाली स्वारी