द्वंद्वगीत

 

पुरुष – हिरव्या हिरव्या रानात
वेळूच्या बनात
सळसळ पानात
घुमतोय आवाज साळूचा
अग अग साळू कुठं तुला न्याहाळू?
अग हायस तू चढाला ||१||

स्त्री – हिरव्या हिरव्या रानात
शालूच्या शेतात
सळसळ ताटात
घुमतोय आवाज बाळूचा

अर अर बाळू कुठं तुला न्याहाळू
अर हाय हाय हायस तू पांदीला ||२||

पुरुष – चाललंय रहाट
भरतीया मवाट
पाटाला पाणी आता जातया
चल उठ साळू फिराया दोघ जावू
त्या त्या त्या त्या टेकडीला ||३||

स्त्री – लई द्वाड माझा बाप
त्याचा लई मला धाक
लावीन मला तो वाटेला
नग नग बाळू इथंच आपण बोलू
त्या त्या त्या त्या पाटाला ||४||

पुरुष – बरं बरं साळू
तुझ्या परमाण करू
हितच आपण फिरू
अन घराची वाट ती धरू या
माघारी नग आता बघाया ||५||

कोळी गीत

 

कोळ्यांच्या नारी आम्ही कोळ्यांच्या नारी |
मनावर खंबीर आम्ही भारी आम्ही भारी |

दादले जाती दर्यावरी हो
जाती दडले दर्यावरी
टाकिती जाळे समिंदरावरी हो
जाले टाकिती समिंदरावरी
मासली आंटी घरोघरी हो
आणती मासली घरोघरी
सुकवितो आम्ही कोळ्यांच्या नारी हो ||१||

कंधी मंधी हो कंधी मंधी
उठता वादल दर्यावरी हो
वादल उठता दर्यावरी
दादला असतो समिंदरावरी हो
असतो दादला समिंदरावरी
काहूर भीतीचा उठतो उरी हो
भीतीचा काहूर उठतो उरी
आई एकवीराचा आधार भारी हो
एकविरा आईचा आधार भारी
जातो एकविरासी कोळ्यांच्या नारी ||२||

बोलतो नवस एकवीराची
नवस बोलतो एकविरासी
दादला सुखरूप पाठव घरासी
सुखरूप दादला पाठव घरासी
खणानारळाची ओटी देईन तुझ्या करी
ओटी खणानारळाची देईन तुझ्या करी ||३||

शेतकरी गीत

 

(कवितेची चाल “येऊ कशी तशी मी नांदायला” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

आभाळ लागलंय गर्जायला
लागलंय आभाळ गर्जायला
बिगी बिगी लागूया कामाला
आता बिगी बिगी लागूया कामाला

शेताची करूया भाजणी भाजणी
पाला गोळा करूया सजनी
पाल्यावर पाला घालोनी पेटवू या सारा अग्नी
ज्वाला लागल्यात भडकायला हो
आता बिगी बिगी लागूया कामाला
हे माझ्या ढवळ्या पवळ्या
नांगरणी करू दिवस ढवळ्या
ढेकळावर ढेकळं लागली पडायला
दिस लागला आता बुडायला
आता बिगी बिगी लागूया कामाला

सरीवर सारी लागल्या कोसळायला
मोसम पेरणीचा आला
सरीवर सारी पाडूया बियाणं हाती घेऊया
बियाणं लागूया टोकायला
बिगी बिगी लागूया कामाला

रान हिरवा लागलं दिसायला
कंसात दाणं लागलं भरायला
गोफण गरगर फिरवायला
माच्या लागूया बनवायला
लागली पाखरं उडायला
बिगी बिगी लागूया कामाला

सरीवर सरी पाडूया बियाणं हाती घेऊया
बियाणं लागूया टोकायला
आता बिगी बिगी लागूया कामाला

धान्याची रास लागली पडायला
पोत्यानी पोटी लागली भरायला
ठरेल लागली त्यात पडायला
आली लक्ष्मी आपुल्या घराला
पूजन लागू या करायला
बिगी बिगी लागूया कामाला

कान्हा रे कान्हा रे

 

(कवितेची चाल “डोला रे डोला रे डोला” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हे कान्हा, हो कान्हा, हा कान्हा, रे कान्हा.
वाजवुनिया बासरी घालुनिया साद
होते मी दंग ऐकुनिया नाद

बांधुनी मी घुंगरू, घालुनिया पायल
मी नाचते नाचते नाचते नाचते नाचते

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हां हां हां हां

पहा रे पहा कशी झंकारही आली
प्रियाच्या भेटीसाठी आतुरही झाली
वेणुनादानेही मोहित झाली
मोहन भेटीसाठी राधाही निघाली
हां हां हां हां

तनामनात माझ्या तोच आहे.
अक्षीही माझ्या तोच आहे.
माझ्या स्वप्नीही तोच आहे.
श्वासी माझ्याही तोच आहे.

कंगनाची खन खन तीच आहे
खन खना खन खन
पायलची छन छन तीच आहे.
छन छना छन छना
छन छन.

आला रे कान्हा आला रंग घेऊन आला
रंग खेळण्या हा दंग आता झाला
राधेच्या प्रेम रंगात हा न्हाला
गोप गोपी रंग खेळात आला

कान्हाच्या हाती रंग आहे
राधेच्या संगे गोपी आहे.
गोपीत राधा शोधत आहे
राधेवर रँड उडवीत आहे.

कंगनाची खन खन तीच आहे.
खन खना खन खना खन
पायलची छन छन तीच आहे.
छनक छन छन….

सहलगीत

 

या सख्यांनो या सयांनो या ग या या
बागेमध्ये आज साऱ्या जाऊ या चला ||धृ||

बागेमध्ये उंच उंच झाडे पाहू या
छायेमध्ये आपण त्यांच्या आज खेळू या
फेर धरू या झिम्मा खेळूया या ||१||

बागेमध्ये रंगीत फुले आज हासती
फुलपाखरे कशी मोदे डुलती
गिरकी घेऊ या, नाचू गाऊ या ||२||

हिरवळीत हिरव्या हिरव्या आज डोळुया
गगनात आज सारे पक्षी पाहू या
खेळ खेळू या – झेप घेऊ या ||३||

बागेमध्ये मोकळी हवा आज घेऊ या
तनमन आज सारे ताजे ठेवू या
आनंद लुटू या – आरोग्य घेऊ या ||४||

जत्रा

 

(कवितेची चाल “तू चीज बडी है मस्त मस्त” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

हि जत्रा आली मस्त मस्त
खुश झालो आम्ही जबरदस्त
नाही आता काही सुचत सुचत
करितो सारे आता फस्त फस्त ||१||
पनीसा परेसा (४ वेळा)

हि आली आता हि माधुरी
नृत्य तिचे कसे आहे भारी
हिला नाही काही तोड तोड
नृत्य तिचे आहे गोड गोड
नाही आता काही सुचत सुचत
नृत्य करितो आम्ही मस्त मस्त ||२||
पनीसा परेसा (४ वेळा)

खेळाची आहेत येथे खूप दुकाने
खेळाचे आहेत येथे सुंदर नमुने
येथे आहे सुंदर कोडे कोडे
सोडवा आता सारे थोडे थोडे
नाही आता, नाही आता
काही सुचत सुचत
खेळ खेळतो आम्ही मस्त ||३||
पनीसा परेसा (४ वेळा)

आला आला पहा भागुजी
रत्ना त्यासाठी चिरते भाजी
भागुजी काढतो खोड खोड
रत्ना देई त्याला फोड फोड
नाही आता, नाही आता
काही सुचत सुचत
खेळ बघतो आम्ही मस्त मस्त ||४||
पनीसा परेसा (४ वेळा)

टिपरी गीत

 

(कवितेची चाल “आधा है चंद्रमा रात आधी – नवरंग” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

आला आला ग कान्हा आज हा वनी |
जमल्या साऱ्या गोपी ग आज काननी ||धृ||

लता वृक्षांनी कानन भरले
फळा फुलांनी रान हे सजले

फुले माळून हातात, गोपी येति तालात
हर्षित गोपी झाल्या ध्यानी मनी ||१||

सूर वेणूचा मधुर घुमला
टिपऱ्या टिपऱ्यांचा नाद हा आला
ध्वनी त्यांचा झाला, आली राधा बाला
आली गात रास राधा राणी ||२||

पायी नुपूर रुणझुण बोले
हाती किन किन कंगण हाले
राधा कृष्ण लीला, जीव वेडा झाला
टिपरी आली रंगात आज राणी वनी ||३||

लागली दिसाया संध्या क्षितिजाला
आली आठव घराची गोपीला
वेणू थांबव माधव, राधे घर आठव
राधा कान्हासह गोपी निघती सदनी ||४||

साक्षरता

(चाल – काळ्या मातीत मातीत …)

काळ्या पाटीवर पाटीवर
रेघ मी ओढीते, रेघ मी ओढीते
तिला आकार मी देते ||धृ||

आकार तो देते, अक्षर काढीते
लिहा-वाचया शिकते
साक्षर मी होते ||१||

साक्षर होऊनि जगाचे
ज्ञान मी मिळविते
जीवन जगण्याचे
सर ते मिळवाया बघते ||२||

घालवुनी अंधार अंधार
प्रकाश घेईन आधार
वाट मी चालते
पाया उभी मी राहते ||३||

नको लाचारीचे ते जिणे
क्षणाक्षणाला अडखळणे
नको मागे ते राहणे
भले जगासवे चालणे ||४||

धरणी

 

धरणी ग धरणी |
किती होतेस व्याकुळ मनी |
पावसाळ्याचा दिनी,
मिळे ना कोठे तुज पाणी ||१||

खंत तुझ्या वाटे मनी
म्हणून का भेगा तुझ्या तनी ?
पडेल का पाऊस या क्षणी
मिटविल का काळीज तडा कुणी ? ||२||

हे तर काम मेघाचे
आळवुनी जिंका मन त्याचे
सांगा कोणी तरी त्याला
धरणीने या टाहो फोडला ||३||

ये ये झरझर खाली ये |
धरणीला त्या साथ दे |
कर तृषार्त धरणीला |
घे दुवा सर्वांचा तुजला ||४||

फाटके वस्त्र

 

एक फाटके वस्त्र
त्याकडे पाहुनी निघती कित्येक शब्दास्त्र |
उडते टर त्या फाटक्या वस्त्राची |
आणि ते परिधान केलेल्या मानवाची |
परी ते वस्त्र का फाटले ?
त्याने कित्येक दिवस मानवा रक्षिले |
रक्षिता रक्षिता सूत ते झिजले |
हे त्या मानवा, अजून ना उमगले |
ज्याने कोणी, कुणासाठी जीवन वेचले |
त्याने त्यासाठी सुखाला त्यागले |
त्या त्यागाने त्याचे शरीर हे खचले |
आणि त्यालाच फाटके वस्त्र परिधान करावे लागले |