प्रेम

 

प्रेम म्हणजे काय असते?
प्रेम म्हणजे आकर्षण असते
प्रेम म्हणजे आसक्ती असते
प्रेम म्हणजे ओढ असते
प्रेमाला वयाची मर्यादा नसते
प्रेमाला कसलेही भान नसते
प्रेम म्हणजे त्यागही असतो
प्रेमाला वेळ काळ नसतो
प्रेम माणसांवर करावे
प्रेम प्राणी पक्ष्यांवार करावे
प्रेम निसर्गावर करावे
प्रेम निसर्गनिर्मात्यावर करावे
प्रेम निखळ निर्व्याज असावे
प्रेम सतत वृद्धिंगत व्हावे
प्रेम कधीही न घटावे
प्रेमाने मन-मन जिंकावे
प्रेम नसते तर? सारे शून्यच असते
प्रेमावरच अखंड जग हे जगते
तरीही प्रेमाला अमूक एक व्याख्या नसते
प्रेमाची भावना खोल मनात रुजते
प्रेमाने सारी वसुंधरा कवेत येते

मित्र

 

आज मी काय केले?
एक लहानसे रोप लावले
रोपाला त्या पाणी घातले
अन निरीक्षण त्याचे मी केले |

सकाळी उठताच अंगणात गेले
रोप माझे मला अंगणात दिसले
रोपाला त्या मी पाणी घातले
मला वाटले रोप मजकडे बघून हसले |

रोज रोज असेच घडले
हसणारे रोप मोठे मोठे झाले
पाना-फुलांनी सारे बहरूनी गेले
बघता बघता काय झाले?

झाडाने साऱ्या उन्हाला घेरले
आम्हा सर्वांवर सावलीचे छत्र धरले
झाड मधुर फळांनी गच्चं भरले
फळे तोडून तोडून दमून गेले
अहो एका एका झाडाने आम्हा समृद्ध केले

म्हणून म्हणते –
झाड आपले मित्र
त्यांना लावू आपण सर्वत्र

द्वंद्वगीत

 

पुरुष – हिरव्या हिरव्या रानात
वेळूच्या बनात
सळसळ पानात
घुमतोय आवाज साळूचा
अग अग साळू कुठं तुला न्याहाळू?
अग हायस तू चढाला ||१||

स्त्री – हिरव्या हिरव्या रानात
शालूच्या शेतात
सळसळ ताटात
घुमतोय आवाज बाळूचा

अर अर बाळू कुठं तुला न्याहाळू
अर हाय हाय हायस तू पांदीला ||२||

पुरुष – चाललंय रहाट
भरतीया मवाट
पाटाला पाणी आता जातया
चल उठ साळू फिराया दोघ जावू
त्या त्या त्या त्या टेकडीला ||३||

स्त्री – लई द्वाड माझा बाप
त्याचा लई मला धाक
लावीन मला तो वाटेला
नग नग बाळू इथंच आपण बोलू
त्या त्या त्या त्या पाटाला ||४||

पुरुष – बरं बरं साळू
तुझ्या परमाण करू
हितच आपण फिरू
अन घराची वाट ती धरू या
माघारी नग आता बघाया ||५||

जोडी

 

कप आणि बशी
आहे जोडी खाशी
कपबशी असे छान |
तर पाहुण्यांची वाढे शान |

कपाला नसेल कान
तर जाईल त्यांचा मान |
कपाला असेल कान
तर चहाची लज्जत महान |

कपबरोबर हवी बशी
वरासम वधू जशी
बशीला कपापासून केले दूर
आणि मगाचा वाढला भलताच नूर

चहाचे मग कॉफीचे मग
बाजारात उभे धरून तग
मगात चहा उच्चंभृंना
त्याने पोळते जीभ हा किस्सा नवा
जीभ पोळण्यापेक्षा मग दूर ठेवा
कपबशीला पूर्वीप्रमाणेच मन द्यावा |

पथिक (व्यक्तिचित्र)

 

एक पथिक चालला होता रस्त्याने |
झाला होता व्याकुळ अति तहानेने |
पाय उचलित नव्हते अति श्रमाने |
घामेजून गेला होता तप्त उन्हाने |
शोधीत होता जल देणारी माउली |
इतक्यात कुटी एक दृष्टीस पडली |
घाईने गेला कुटीच्या दारी |
एक स्त्री होती उभी पाठमोरी |
तिने साडी परिधान केली होती कोरी |
पाठमोरी असूनही भासे साक्षात लक्षमी गोरी |
चाहुलीनेही तिची भावसमाधी न ढाले क्षणभरी |
हलकेच शेवटी दिली त्याने ललकारी |
तहानेने अति व्याकुळ झालो भारी |
दे माई मज पाणी आणून लवकरी |
गेली आत चॅपलगतीने स्त्री सत्वरी |
पाणी आणिले तिने तांब्याभरी |
पथिक ते घटाघट प्राशन करी |
भागातच तृष्णा आशीर्वच उच्चारी |
पथिक आपले मार्गक्रमण करी |
स्त्रीच्या मुखी हो आनंदभव उभारी |

मैत्रीण

 

एकदा मी एकटी होते घरा
खेळायला माझ्याशी कोणी नव्हते जरा |
विनू गेला आजीकडे, बानू गेली मामीकडे |
एकटीच मी करीत होते इकडे तिकडे |

‘च’ कंटाळून मी म्हंटले मनाशी |
इतक्यात लक्ष गेले कोनाड्याशी |
मैत्रीण होती माझी कोनाड्यात |
माझीच माझी वाट पहात |

चटकन मी गेले कोनाड्याशी |
उचलून तिला मी घेतले हाताशी |
कोण माझी मैत्रीण ठाऊक आहे तुम्हाला ?
घाऱ्या डोळ्यांची बाहुली माझी श्यामला |
श्यामला माझी मला मिळाली खेळायला |
वाट नको आता कोणाची बघायला |