पुण्याचा ट्रॅफिक

 

(कवितेची चाल “लेके पेहला पेहला प्यार” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube व्हिडिओ बघा)

पुण्याचा ट्रॅफिक हा बेकार
त्याने केले हैराण फार
किती सांगू? सांगू तुला मी
जीव झाला हो बेजार ||धृ||
पुण्याचा ट्रॅफिक….

रस्त्यामधुनी साऱ्या गाड्या पुढे धावती
पायी चालणाऱ्यांची कोणी पर्वा नाही करती
जीव मुठीत घेवून ठार
करती रस्ता तो हा पार
किती सांगू? सांगू तुला मी… ||१||

सिग्नल येताच गाड्या ब्रेक हा लाविती
धूर सारा सोडूनिया प्रदूषण करिती
नका-तोंडात धूर जाणार
त्याने जीव हा गुदमरणार
किती सांगू? सांगू तुला मी… ||२||

तास तास आधी निघूनही वेळ नाही गाठती
पायी चालणाऱ्यांची होते वाईट हो स्थिती
रोज सामना ट्रॅफिकशी होणार
तरच मार्ग तो हा निघणार
किती सांगू? सांगू तुला मी…||३||

दिनचर्या

 

उठ मुकुंदा उठ श्रीधरा
अरुणोदय झाला |
उठ लवकरी मीनाताई नळ तो सुरु जाहला |

पहिली माझी ओवी ग
दुधाला जाण्याची
दुध आणल्यावरीच मिळे
संधी चहाची लज्जत घेण्याची |
टील्लम टील्लम टाळ वाजला
दारी कोण हा आला
वासुदेव म्हणती तयाला
ठेवा सकाळ अन लोकसत्ता बाजूला
लागा हरीचे नामकरण मुखी घ्यायला
महागाईच्या भस्मासुरासी व्हा सामोरे जायाला |

उठा उठा त्वरा करा
नऊ वाजले बघा जरा
मुखी चार घास लवकर भरा
अन कामासाठी आधी रस्ता धरा
दिवसभर कष्टाची कास धरा
उसंत तुम्हा नाही मिळणार जरा
सहा वाजेतो शक्तीचा होईल ऱ्हास सारा
मग थकुनि भागूनी हो घराचा रस्ता धरा
घरी येताच वाटे बोलू नये कोणाशीही जरा
चिमण पाखरे अवती भोवती चिवचिवाट नको सारा
राग निघतो त्यांच्यावरी – शुकशुकाट होतो घरा
अरुणोदयापासून अरुनास्तापर्यंतची दिनचर्या ऐका जरा |

भिंती-आख्यान

 

तो गरीब मी श्रीमंतजन
त्याकडे दारिद्र्य, मजकडे सुवर्णखान |
आहे प्रचलित भिंती आख्यान |
मी बहुजन तो हरिजन
माझे शुद्ध टॅन त्याचे अशुद्ध मन
आहे प्रचलित भिंती आख्यान |
मी विद्वान तो बावळट ध्यान
मी करतो विचारांचे दान
तो वाकवितो माजपुढे मन
मी उदार यातच शान
तो कवडीचुंबक वदन्यात समाधान
मी करतो स्वहस्ते दान
तो हलवितो नकारार्थी मान
आहे प्रचलित भिंती आख्यान
मी आहे क्रियाशील मॅन
तो निष्क्रियतेचा फॅन
मी करतो कामच काम
तो काढतो झोप छान
आहे प्रचलित भिंतीत आख्यान
जेव्हा संपेल हे भिंतीत आख्यान
जेव्हा मिटतील असमानतेचे ताण
जेव्हा संपतील दुष्ट विचारांचे थैमान
तेव्हाच बनेल देश महान देश महान |

द्वंद्वगीत

 

पुरुष – हिरव्या हिरव्या रानात
वेळूच्या बनात
सळसळ पानात
घुमतोय आवाज साळूचा
अग अग साळू कुठं तुला न्याहाळू?
अग हायस तू चढाला ||१||

स्त्री – हिरव्या हिरव्या रानात
शालूच्या शेतात
सळसळ ताटात
घुमतोय आवाज बाळूचा

अर अर बाळू कुठं तुला न्याहाळू
अर हाय हाय हायस तू पांदीला ||२||

पुरुष – चाललंय रहाट
भरतीया मवाट
पाटाला पाणी आता जातया
चल उठ साळू फिराया दोघ जावू
त्या त्या त्या त्या टेकडीला ||३||

स्त्री – लई द्वाड माझा बाप
त्याचा लई मला धाक
लावीन मला तो वाटेला
नग नग बाळू इथंच आपण बोलू
त्या त्या त्या त्या पाटाला ||४||

पुरुष – बरं बरं साळू
तुझ्या परमाण करू
हितच आपण फिरू
अन घराची वाट ती धरू या
माघारी नग आता बघाया ||५||

कान्हा रे कान्हा रे

 

(कवितेची चाल “डोला रे डोला रे डोला” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हे कान्हा, हो कान्हा, हा कान्हा, रे कान्हा.
वाजवुनिया बासरी घालुनिया साद
होते मी दंग ऐकुनिया नाद

बांधुनी मी घुंगरू, घालुनिया पायल
मी नाचते नाचते नाचते नाचते नाचते

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हां हां हां हां

पहा रे पहा कशी झंकारही आली
प्रियाच्या भेटीसाठी आतुरही झाली
वेणुनादानेही मोहित झाली
मोहन भेटीसाठी राधाही निघाली
हां हां हां हां

तनामनात माझ्या तोच आहे.
अक्षीही माझ्या तोच आहे.
माझ्या स्वप्नीही तोच आहे.
श्वासी माझ्याही तोच आहे.

कंगनाची खन खन तीच आहे
खन खना खन खन
पायलची छन छन तीच आहे.
छन छना छन छना
छन छन.

आला रे कान्हा आला रंग घेऊन आला
रंग खेळण्या हा दंग आता झाला
राधेच्या प्रेम रंगात हा न्हाला
गोप गोपी रंग खेळात आला

कान्हाच्या हाती रंग आहे
राधेच्या संगे गोपी आहे.
गोपीत राधा शोधत आहे
राधेवर रँड उडवीत आहे.

कंगनाची खन खन तीच आहे.
खन खना खन खना खन
पायलची छन छन तीच आहे.
छनक छन छन….

साक्षरता

(चाल – काळ्या मातीत मातीत …)

काळ्या पाटीवर पाटीवर
रेघ मी ओढीते, रेघ मी ओढीते
तिला आकार मी देते ||धृ||

आकार तो देते, अक्षर काढीते
लिहा-वाचया शिकते
साक्षर मी होते ||१||

साक्षर होऊनि जगाचे
ज्ञान मी मिळविते
जीवन जगण्याचे
सर ते मिळवाया बघते ||२||

घालवुनी अंधार अंधार
प्रकाश घेईन आधार
वाट मी चालते
पाया उभी मी राहते ||३||

नको लाचारीचे ते जिणे
क्षणाक्षणाला अडखळणे
नको मागे ते राहणे
भले जगासवे चालणे ||४||

धरणी

 

धरणी ग धरणी |
किती होतेस व्याकुळ मनी |
पावसाळ्याचा दिनी,
मिळे ना कोठे तुज पाणी ||१||

खंत तुझ्या वाटे मनी
म्हणून का भेगा तुझ्या तनी ?
पडेल का पाऊस या क्षणी
मिटविल का काळीज तडा कुणी ? ||२||

हे तर काम मेघाचे
आळवुनी जिंका मन त्याचे
सांगा कोणी तरी त्याला
धरणीने या टाहो फोडला ||३||

ये ये झरझर खाली ये |
धरणीला त्या साथ दे |
कर तृषार्त धरणीला |
घे दुवा सर्वांचा तुजला ||४||

फाटके वस्त्र

 

एक फाटके वस्त्र
त्याकडे पाहुनी निघती कित्येक शब्दास्त्र |
उडते टर त्या फाटक्या वस्त्राची |
आणि ते परिधान केलेल्या मानवाची |
परी ते वस्त्र का फाटले ?
त्याने कित्येक दिवस मानवा रक्षिले |
रक्षिता रक्षिता सूत ते झिजले |
हे त्या मानवा, अजून ना उमगले |
ज्याने कोणी, कुणासाठी जीवन वेचले |
त्याने त्यासाठी सुखाला त्यागले |
त्या त्यागाने त्याचे शरीर हे खचले |
आणि त्यालाच फाटके वस्त्र परिधान करावे लागले |

पथिक (व्यक्तिचित्र)

 

एक पथिक चालला होता रस्त्याने |
झाला होता व्याकुळ अति तहानेने |
पाय उचलित नव्हते अति श्रमाने |
घामेजून गेला होता तप्त उन्हाने |
शोधीत होता जल देणारी माउली |
इतक्यात कुटी एक दृष्टीस पडली |
घाईने गेला कुटीच्या दारी |
एक स्त्री होती उभी पाठमोरी |
तिने साडी परिधान केली होती कोरी |
पाठमोरी असूनही भासे साक्षात लक्षमी गोरी |
चाहुलीनेही तिची भावसमाधी न ढाले क्षणभरी |
हलकेच शेवटी दिली त्याने ललकारी |
तहानेने अति व्याकुळ झालो भारी |
दे माई मज पाणी आणून लवकरी |
गेली आत चॅपलगतीने स्त्री सत्वरी |
पाणी आणिले तिने तांब्याभरी |
पथिक ते घटाघट प्राशन करी |
भागातच तृष्णा आशीर्वच उच्चारी |
पथिक आपले मार्गक्रमण करी |
स्त्रीच्या मुखी हो आनंदभव उभारी |

संबंध

 

बीज पेरता रुजले
रोप ते उगवले
वाढत वाढत वर गेले
फुटले त्यासी अनेक शाखा
हरितपर्णांनो त्यांसी झाका |
असंख्य शाखाचा, असंख्य पर्णांचा
डेरेदार वृक्ष तो बनावा |
त्याने आपल्या मुळाने मातीला स्पर्शावे |
मिळेल आधार त्याचा मातीला
वाचेल क्षय तिचा त्या घटकेला |
मातीची जर झाली नाही झीज |
तर ती निर्मित असंख्य चीज |
त्या चिजांसी काय वर्णावे
मनुष्याचे जीवन सुखमय व्हावे