रे पाखरांनो

 

होत आल्या तिन्ही सांजा
जा पाखरांनो निघा घरट्याकडे जा
भरारी मारुनी शिणल्या शरीरा
घरट्यात झोकून द्या जरा |

कोंबडा देईल बांग कधी, कान तुम्ही टवकारा
चिवचिवाट करुनि आसमंत सारा
मनुजास तुम्ही जागे करा |
म्हणा पंखात घेवूनी शक्तीचा झरा
ध्येय प्राप्तीस सोडितो पहाटेच घरा
तुम्हीही सत्वर उठा जरा
आळसास त्या बाजूस करा |

जीव अमुचा चिमुकलासा तरीही पंख पसरुनी अंतर कापतो भरारा
एवढ्या मोठ्या देहाचा भल्यासाठी तुम्ही उपयोग करा |
ईश्वराने दिली ज्ञानेंद्रिये तुम्हाला
बुद्धीची जोडही हि तुमच्या वाट्याला

मग अडले हो तुमचे कशाला?
या सर्वांचा उपयोग करुनि उज्ज्वल करा जीवनाला

माकडाला लागली भूक

 

एकदा एका माकडाला लागली भूक खूप |
उडया मारी तो झाडावर करीत हूप हूप |
झाडावर त्याला कोठेही मिळेना फळ |
निघेना आता त्याला भुकेची कळ |
टुणकन झाडावरून मारली त्याने उडी |
गंपूच्या खिडकीमागे मारली त्याने दडी |
गंपू होता अंथरुणात गाढ झोपेमध्ये |
माकडाच्या समोर होते जेवणाचे डबे |
जेवणाचे डबे सारे पहिले तपासून |
भाजी, पोळी, भाकरी लोणचे खाल्ले सपाटून |
खाऊन पिऊन माकडाची भूक झाली शांत |
गंपू होता झोपेतच माकड बाहेर पडले निवांत |

बडबडगीत

 

उंदराला एका सापडला फुटाणा
लगेच तिथे आली माऊताई मौना |
माऊताईला पाहून उंदीर गेला बिथरून |
पडला फुटाणा गडगडाट गेला घसरून |
उंदीरमामा बसले चडफडत थिजून |
लगेच गेल्या माऊताई मौना निघून |
टुणकन उडी मारून मिळवला फुटाणा |
घेतला फुटाणा शिरले बिळात |
फस्त केला फुटाणा एका क्षणात |

रानातल्या राघू

 

रानातल्या राघू माझा ऐकशील ना |
अंगणात माझ्या तू येशील ना |
परसातल्या झाडाचे पेरू किती गोड |
ठेवीन तुझ्यासाठी मी एक फोड |
पेरूची चव तू घेशील ना ? ||१||

हिरवे हिरवे पाचूसम अंग तुझे |
बघून वेडे मन मोहरे माझे |
लाल-लाल तुझ्या चोचीने या |
डाळिंब तू रे फोडशील ना ? ||२||

रानातला एकांत आवडे तुला
गुपित तुझे माहित मला
माझ्यासाठी एकदाच येशील ना ?
फांदीचा झुला करशील ना ?