साक्षरता

(चाल – काळ्या मातीत मातीत …)

काळ्या पाटीवर पाटीवर
रेघ मी ओढीते, रेघ मी ओढीते
तिला आकार मी देते ||धृ||

आकार तो देते, अक्षर काढीते
लिहा-वाचया शिकते
साक्षर मी होते ||१||

साक्षर होऊनि जगाचे
ज्ञान मी मिळविते
जीवन जगण्याचे
सर ते मिळवाया बघते ||२||

घालवुनी अंधार अंधार
प्रकाश घेईन आधार
वाट मी चालते
पाया उभी मी राहते ||३||

नको लाचारीचे ते जिणे
क्षणाक्षणाला अडखळणे
नको मागे ते राहणे
भले जगासवे चालणे ||४||

धरणी

 

धरणी ग धरणी |
किती होतेस व्याकुळ मनी |
पावसाळ्याचा दिनी,
मिळे ना कोठे तुज पाणी ||१||

खंत तुझ्या वाटे मनी
म्हणून का भेगा तुझ्या तनी ?
पडेल का पाऊस या क्षणी
मिटविल का काळीज तडा कुणी ? ||२||

हे तर काम मेघाचे
आळवुनी जिंका मन त्याचे
सांगा कोणी तरी त्याला
धरणीने या टाहो फोडला ||३||

ये ये झरझर खाली ये |
धरणीला त्या साथ दे |
कर तृषार्त धरणीला |
घे दुवा सर्वांचा तुजला ||४||

फाटके वस्त्र

 

एक फाटके वस्त्र
त्याकडे पाहुनी निघती कित्येक शब्दास्त्र |
उडते टर त्या फाटक्या वस्त्राची |
आणि ते परिधान केलेल्या मानवाची |
परी ते वस्त्र का फाटले ?
त्याने कित्येक दिवस मानवा रक्षिले |
रक्षिता रक्षिता सूत ते झिजले |
हे त्या मानवा, अजून ना उमगले |
ज्याने कोणी, कुणासाठी जीवन वेचले |
त्याने त्यासाठी सुखाला त्यागले |
त्या त्यागाने त्याचे शरीर हे खचले |
आणि त्यालाच फाटके वस्त्र परिधान करावे लागले |

पथिक (व्यक्तिचित्र)

 

एक पथिक चालला होता रस्त्याने |
झाला होता व्याकुळ अति तहानेने |
पाय उचलित नव्हते अति श्रमाने |
घामेजून गेला होता तप्त उन्हाने |
शोधीत होता जल देणारी माउली |
इतक्यात कुटी एक दृष्टीस पडली |
घाईने गेला कुटीच्या दारी |
एक स्त्री होती उभी पाठमोरी |
तिने साडी परिधान केली होती कोरी |
पाठमोरी असूनही भासे साक्षात लक्षमी गोरी |
चाहुलीनेही तिची भावसमाधी न ढाले क्षणभरी |
हलकेच शेवटी दिली त्याने ललकारी |
तहानेने अति व्याकुळ झालो भारी |
दे माई मज पाणी आणून लवकरी |
गेली आत चॅपलगतीने स्त्री सत्वरी |
पाणी आणिले तिने तांब्याभरी |
पथिक ते घटाघट प्राशन करी |
भागातच तृष्णा आशीर्वच उच्चारी |
पथिक आपले मार्गक्रमण करी |
स्त्रीच्या मुखी हो आनंदभव उभारी |

संबंध

 

बीज पेरता रुजले
रोप ते उगवले
वाढत वाढत वर गेले
फुटले त्यासी अनेक शाखा
हरितपर्णांनो त्यांसी झाका |
असंख्य शाखाचा, असंख्य पर्णांचा
डेरेदार वृक्ष तो बनावा |
त्याने आपल्या मुळाने मातीला स्पर्शावे |
मिळेल आधार त्याचा मातीला
वाचेल क्षय तिचा त्या घटकेला |
मातीची जर झाली नाही झीज |
तर ती निर्मित असंख्य चीज |
त्या चिजांसी काय वर्णावे
मनुष्याचे जीवन सुखमय व्हावे

पदार्थ थाळी

 

आली आली दिवाळी
छान छान पदार्थांची भरली थाळी
थाळीत आली करंजी
गोड गोड अंतरंगी |
थाळीत आला बुंदीचा लाडू |
याला आता कसा सोडू?
थाळीत आली शंकरपाळी |
फारच चविष्ट वाजवा टाळी |
थाळीत आले जाळीदार अनारसे |
मोजकेच खा राव कसे |
थाळीत आली बाकरवडी
क्षणात संपली तिची चवच न्यारी |
थाळीत आला तिखटजाळ चिवडा |
पाहून आम्हाला राग आला केवढा |
भरल्या पोटाचा राग चिवड्यावर
गोड नसते तर भागले असते त्याच्यावर |