रे पाखरांनो

 

होत आल्या तिन्ही सांजा
जा पाखरांनो निघा घरट्याकडे जा
भरारी मारुनी शिणल्या शरीरा
घरट्यात झोकून द्या जरा |

कोंबडा देईल बांग कधी, कान तुम्ही टवकारा
चिवचिवाट करुनि आसमंत सारा
मनुजास तुम्ही जागे करा |
म्हणा पंखात घेवूनी शक्तीचा झरा
ध्येय प्राप्तीस सोडितो पहाटेच घरा
तुम्हीही सत्वर उठा जरा
आळसास त्या बाजूस करा |

जीव अमुचा चिमुकलासा तरीही पंख पसरुनी अंतर कापतो भरारा
एवढ्या मोठ्या देहाचा भल्यासाठी तुम्ही उपयोग करा |
ईश्वराने दिली ज्ञानेंद्रिये तुम्हाला
बुद्धीची जोडही हि तुमच्या वाट्याला

मग अडले हो तुमचे कशाला?
या सर्वांचा उपयोग करुनि उज्ज्वल करा जीवनाला

पुण्याचा ट्रॅफिक

 

(कवितेची चाल “लेके पेहला पेहला प्यार” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube व्हिडिओ बघा)

पुण्याचा ट्रॅफिक हा बेकार
त्याने केले हैराण फार
किती सांगू? सांगू तुला मी
जीव झाला हो बेजार ||धृ||
पुण्याचा ट्रॅफिक….

रस्त्यामधुनी साऱ्या गाड्या पुढे धावती
पायी चालणाऱ्यांची कोणी पर्वा नाही करती
जीव मुठीत घेवून ठार
करती रस्ता तो हा पार
किती सांगू? सांगू तुला मी… ||१||

सिग्नल येताच गाड्या ब्रेक हा लाविती
धूर सारा सोडूनिया प्रदूषण करिती
नका-तोंडात धूर जाणार
त्याने जीव हा गुदमरणार
किती सांगू? सांगू तुला मी… ||२||

तास तास आधी निघूनही वेळ नाही गाठती
पायी चालणाऱ्यांची होते वाईट हो स्थिती
रोज सामना ट्रॅफिकशी होणार
तरच मार्ग तो हा निघणार
किती सांगू? सांगू तुला मी…||३||

दिनचर्या

 

उठ मुकुंदा उठ श्रीधरा
अरुणोदय झाला |
उठ लवकरी मीनाताई नळ तो सुरु जाहला |

पहिली माझी ओवी ग
दुधाला जाण्याची
दुध आणल्यावरीच मिळे
संधी चहाची लज्जत घेण्याची |
टील्लम टील्लम टाळ वाजला
दारी कोण हा आला
वासुदेव म्हणती तयाला
ठेवा सकाळ अन लोकसत्ता बाजूला
लागा हरीचे नामकरण मुखी घ्यायला
महागाईच्या भस्मासुरासी व्हा सामोरे जायाला |

उठा उठा त्वरा करा
नऊ वाजले बघा जरा
मुखी चार घास लवकर भरा
अन कामासाठी आधी रस्ता धरा
दिवसभर कष्टाची कास धरा
उसंत तुम्हा नाही मिळणार जरा
सहा वाजेतो शक्तीचा होईल ऱ्हास सारा
मग थकुनि भागूनी हो घराचा रस्ता धरा
घरी येताच वाटे बोलू नये कोणाशीही जरा
चिमण पाखरे अवती भोवती चिवचिवाट नको सारा
राग निघतो त्यांच्यावरी – शुकशुकाट होतो घरा
अरुणोदयापासून अरुनास्तापर्यंतची दिनचर्या ऐका जरा |

माझ्या अंगणात

 

(कवितेची चाल “म्हारे हावडा मी नाचे मोर” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube व्हिडिओ बघा)

माझ्या अंगणात नाचतोय मोर
तक थैय्या थैय्या
इंद्रधनूची उठली कोर
लागे रंग उधळया

आला पाऊस आल्या धारा, धरतीला भिजवाया
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||१||

तू सुंदर सुंदर पक्षी
तुझ्या तनूवर मोहक पक्षी – ओ ओ ओ
ताव रूपाने ताव ऐटीने
मोहित केले मम् पक्षी

मम् मोदचे कारण बनुनी आला रे तू मयुराया
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||२||

तू झालास पक्ष्यांचा राजा
पक्षी राष्ट्रीय बनलास माझा ओ ओ ओ
तुझ्या रंगाने अन नृत्याने
मोहरले जीवन आहे
तव नृत्याने तव बोलीने मोहित झाली मम् काया
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||३||

हे काळे काळे घण आले
पाहुनी तव मन मोहित झाले
तव नृत्याचा तव हर्षाचा
ठसा मनी उठला आहे
मनात ठसूनी डोळ्यात बघुनी घे निरोप मनरमना
माझ्या अंगणात नाचतोय मोर तक थैय्या थैय्या ||४||

 

काश्मिरी काश्मिरी


(कवितेची चाल “भूमरो भूमरो” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

काश्मिरी काश्मिरी आम्ही सारे काश्मिरी
आला हो हिमगिरीहुनी ओ ओ ओ हु S S ||धृ||

आलो हो आलो आम्ही
गुलाब घेऊनि आलो
गुलाबी रंगात या
न्हाउनी मुग्ध झालो

हो हो गुलाबी थंडी आली
मन आम्ही रिझविता
शिकारे घेऊनि आलो
झील आम्ही पर करितो

या हो तुम्ही नावेमधूनी
गीत गाऊ साद घालू
मौज करू काश्मिरी ||१||

गोरीचे गाल कसे
सफरचंदी बाग जसे
निळ्याशार पाण्यामध्ये रक्तवर्ण पद्म जसे ||२||

हा रंग प्रेमाचा हो
हा रंग स्नेहाचा हो
आपसात वैर नाही
देशाची शान आहे

आम्ही सारे एक हो
सत्यम शिवम सुंदर याशी
जुळले आमुचे नटे हो ||३||

हिमगिरीत आमच्या
माता वैष्णवी ही
तिच्या दर्शन हो येती
भक्तजन नित्य येती S S S ||४||

काश्मीर भारताचे
नंदनवन आहे
देशाच्या आमुच्या हे
गौरवस्थान आहे
हे तराफे फिरती येथे

पाण्यावरती शेते
सुंदरता ही घेउनी आले
अवनीवरती तारे ||५||

काश्मिरी काश्मिरी …

 

 

द्वंद्वगीत

 

पुरुष – हिरव्या हिरव्या रानात
वेळूच्या बनात
सळसळ पानात
घुमतोय आवाज साळूचा
अग अग साळू कुठं तुला न्याहाळू?
अग हायस तू चढाला ||१||

स्त्री – हिरव्या हिरव्या रानात
शालूच्या शेतात
सळसळ ताटात
घुमतोय आवाज बाळूचा

अर अर बाळू कुठं तुला न्याहाळू
अर हाय हाय हायस तू पांदीला ||२||

पुरुष – चाललंय रहाट
भरतीया मवाट
पाटाला पाणी आता जातया
चल उठ साळू फिराया दोघ जावू
त्या त्या त्या त्या टेकडीला ||३||

स्त्री – लई द्वाड माझा बाप
त्याचा लई मला धाक
लावीन मला तो वाटेला
नग नग बाळू इथंच आपण बोलू
त्या त्या त्या त्या पाटाला ||४||

पुरुष – बरं बरं साळू
तुझ्या परमाण करू
हितच आपण फिरू
अन घराची वाट ती धरू या
माघारी नग आता बघाया ||५||

कोळी गीत

 

कोळ्यांच्या नारी आम्ही कोळ्यांच्या नारी |
मनावर खंबीर आम्ही भारी आम्ही भारी |

दादले जाती दर्यावरी हो
जाती दडले दर्यावरी
टाकिती जाळे समिंदरावरी हो
जाले टाकिती समिंदरावरी
मासली आंटी घरोघरी हो
आणती मासली घरोघरी
सुकवितो आम्ही कोळ्यांच्या नारी हो ||१||

कंधी मंधी हो कंधी मंधी
उठता वादल दर्यावरी हो
वादल उठता दर्यावरी
दादला असतो समिंदरावरी हो
असतो दादला समिंदरावरी
काहूर भीतीचा उठतो उरी हो
भीतीचा काहूर उठतो उरी
आई एकवीराचा आधार भारी हो
एकविरा आईचा आधार भारी
जातो एकविरासी कोळ्यांच्या नारी ||२||

बोलतो नवस एकवीराची
नवस बोलतो एकविरासी
दादला सुखरूप पाठव घरासी
सुखरूप दादला पाठव घरासी
खणानारळाची ओटी देईन तुझ्या करी
ओटी खणानारळाची देईन तुझ्या करी ||३||

शेतकरी गीत

 

(कवितेची चाल “येऊ कशी तशी मी नांदायला” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

आभाळ लागलंय गर्जायला
लागलंय आभाळ गर्जायला
बिगी बिगी लागूया कामाला
आता बिगी बिगी लागूया कामाला

शेताची करूया भाजणी भाजणी
पाला गोळा करूया सजनी
पाल्यावर पाला घालोनी पेटवू या सारा अग्नी
ज्वाला लागल्यात भडकायला हो
आता बिगी बिगी लागूया कामाला
हे माझ्या ढवळ्या पवळ्या
नांगरणी करू दिवस ढवळ्या
ढेकळावर ढेकळं लागली पडायला
दिस लागला आता बुडायला
आता बिगी बिगी लागूया कामाला

सरीवर सारी लागल्या कोसळायला
मोसम पेरणीचा आला
सरीवर सारी पाडूया बियाणं हाती घेऊया
बियाणं लागूया टोकायला
बिगी बिगी लागूया कामाला

रान हिरवा लागलं दिसायला
कंसात दाणं लागलं भरायला
गोफण गरगर फिरवायला
माच्या लागूया बनवायला
लागली पाखरं उडायला
बिगी बिगी लागूया कामाला

सरीवर सरी पाडूया बियाणं हाती घेऊया
बियाणं लागूया टोकायला
आता बिगी बिगी लागूया कामाला

धान्याची रास लागली पडायला
पोत्यानी पोटी लागली भरायला
ठरेल लागली त्यात पडायला
आली लक्ष्मी आपुल्या घराला
पूजन लागू या करायला
बिगी बिगी लागूया कामाला

कान्हा रे कान्हा रे

 

(कवितेची चाल “डोला रे डोला रे डोला” ह्या चित्रपटातील गाण्यावर आहे. चालीसाठी कवितेनंतर खाली दिलेला YouTube बघा)

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हे कान्हा, हो कान्हा, हा कान्हा, रे कान्हा.
वाजवुनिया बासरी घालुनिया साद
होते मी दंग ऐकुनिया नाद

बांधुनी मी घुंगरू, घालुनिया पायल
मी नाचते नाचते नाचते नाचते नाचते

कान्हा रे कान्हा रे कान्हा रे कान्हा रे
हां हां हां हां

पहा रे पहा कशी झंकारही आली
प्रियाच्या भेटीसाठी आतुरही झाली
वेणुनादानेही मोहित झाली
मोहन भेटीसाठी राधाही निघाली
हां हां हां हां

तनामनात माझ्या तोच आहे.
अक्षीही माझ्या तोच आहे.
माझ्या स्वप्नीही तोच आहे.
श्वासी माझ्याही तोच आहे.

कंगनाची खन खन तीच आहे
खन खना खन खन
पायलची छन छन तीच आहे.
छन छना छन छना
छन छन.

आला रे कान्हा आला रंग घेऊन आला
रंग खेळण्या हा दंग आता झाला
राधेच्या प्रेम रंगात हा न्हाला
गोप गोपी रंग खेळात आला

कान्हाच्या हाती रंग आहे
राधेच्या संगे गोपी आहे.
गोपीत राधा शोधत आहे
राधेवर रँड उडवीत आहे.

कंगनाची खन खन तीच आहे.
खन खना खन खना खन
पायलची छन छन तीच आहे.
छनक छन छन….

सहलगीत

 

या सख्यांनो या सयांनो या ग या या
बागेमध्ये आज साऱ्या जाऊ या चला ||धृ||

बागेमध्ये उंच उंच झाडे पाहू या
छायेमध्ये आपण त्यांच्या आज खेळू या
फेर धरू या झिम्मा खेळूया या ||१||

बागेमध्ये रंगीत फुले आज हासती
फुलपाखरे कशी मोदे डुलती
गिरकी घेऊ या, नाचू गाऊ या ||२||

हिरवळीत हिरव्या हिरव्या आज डोळुया
गगनात आज सारे पक्षी पाहू या
खेळ खेळू या – झेप घेऊ या ||३||

बागेमध्ये मोकळी हवा आज घेऊ या
तनमन आज सारे ताजे ठेवू या
आनंद लुटू या – आरोग्य घेऊ या ||४||